
नॉटिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी ट्रेंट ब्रिज येथे सुरू होणार आहे. भारताला मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आणि इंग्लंडला विजयी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरतील, परंतु 2-0 अशा आघाडीमुळे इंग्लंडचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. त्याच आत्मविश्वासाने इंग्लंड संघाने तिसरी कसोटीही जिंकण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे.
पहिल्या कसोटीत विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना अपयश आले होते. दुसऱ्या कसोटीत तर विराटसह सर्वच अपयशी ठरले. पहिल्या कसोटीत भारतीय संघ विजय मिळवेल असे वाटत असताना अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने इंग्लंडला विजय मिळवून दिला. पण, न्यायालयीन चौकशीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता आले नव्हते. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटीसाठी त्याला पुन्हा संघात दाखल करून घेतले आहे आणि तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला संघाची घोषणा केली आणि त्या त्यांनी स्टोक्सला संधी दिली आहे. त्याच्या समावेशामुळे 20 वर्षीय सॅम कुरनला मुकावे लागेल. ‘ तो खेळण्यासाठी आतुर होता आणि तिसऱ्या कसोटीत आपल्या कामगिरीतून तो पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे,’ असे मत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सांगितले. त्याचवेळी त्याने कुरनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय अवघड असल्याचे सांगितले.